हा प्रवास सुंदर आहे……

      'वसुंधरेचे शोधयात्री' चे प्रकाशन आणि पुस्तकाचे अंतरंग


भूगोलासारख्या महत्त्वाच्या विषयाबाबत असलेले अज्ञान हा आपला दोष आहे. त्या अज्ञानाची बीजे अजूनही आपल्या रक्तात आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. अनुराग लव्हेकर यांनी लिहिलेले 'वसुंधरेचे शोधयात्री' हे पुस्तक महत्वाचे असून, भुगोलाचा इतिहास माहीत नाही अशांना हा इतिहास कळावा यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक तथा चतुरस्त्र लेखक गिरीश कुबेर यांनी येथे केले.

नांदेड येथील पचनसंस्था विकारतज्ञ डॉ. अनुराग लव्हेकर यांनी पृथ्वी धुंडाळणाऱ्या शोध नायकांची विखुरलेली माहिती संकलित करुन लिहिलेल्या 'वसुंधरेचे शोधयात्री' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि. ७ मार्च रोजी नांदेडच्या शंकरराव चव्हाण नियोजन भवनात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून 'भुगोलकोश'कार एल. के. कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, लेखक डॉ. अनुराग व डॉ. अमरजा लव्हेकर यांची उपस्थिती होती.



यावेळी गिरीश कुबेर यांनी भुगोलाचे महत्त्व अधोरेखित केले. भुगोलाचे ज्ञान नसण्याचे परिणाम खूप गंभीर आहेत. या अज्ञानाची किंमत आपण किती देत आहोत याचा गंधही आपल्याला नाही. जगण्याचे संदर्भ माहीत करण्याचे काम भूगोल शिकवते. छत्रपती शिवाजी महाराज हे भुगोलामध्ये निष्णात होते म्हणूनच त्यांना अफजलखान, शाहिस्तेखान यांच्या बरोबरच्या युध्दकारवाया यशस्वी करता आल्या.

भूगोल माहीत असला की, उदात्त स्वप्ने पडतात आणि ती सत्यातही येतात. याचे उदाहरण म्हणजे बिल गेटस! 'वसुंधरेचे शोधयात्री' हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे. भुगोलाकडे लोकांचे लक्ष वेधावे, हा या पुस्तकाचा उद्देश आहे. भुगोलाचा अभ्यास करण्याची सवय लागली तर जाणीवा विस्तारायला मदत होते. पिढी पुढे जायची असेल तर ज्ञानाचा प्रसार करणारी पुस्तके लिहीली गेली पाहिजेत. भारतात शुध्द मराठीत लिहिण्याची फार मोठी परंपरा आपल्याला लाभली आहे. आपल्याला इतिहास समजून घ्यायचा असेल तर भूगोल माहिती असावा लागतो, असेही यावेळी गिरीश कुबेर म्हणाले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे भुगोलकोशकार एल. के. कुलकर्णी यांचे सदर पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवणारे भाषण झाले.

कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाली. प्रास्ताविक डॉ. अमरजा लव्हेकर यांनी केले तर डॉ. अनुराग यांनी मनोगतात पुस्तकाच्या निर्मितीची गोष्ट सांगितली. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचा परिचय संजीव कुळकर्णी यांनी करून दिला. राजहंस प्रकाशनाचे सदानंद बोरसे यांच्या शुभेच्छा पत्राचे वाचन सूत्रसंचालनकर्त्या अश्विनी चौधरी यांनी केले. डॉ. अनघा लव्हेकर यांच्या आभार  प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



पुस्तकाच्या अंतरंगात

'आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निळे…

'वसुंधरेचे शोधयात्री' हे डॉ. अनुराग लव्हेकर यांनी लिहिलेले पहिले पुस्तक तेही सुमारे ३५ वर्षानंतर भुगोल विषयावरील मराठीतील पहिलेच पुस्तक आहे.

या पुस्तकाची निर्मितीही प्रेरणादायी आहे. डॉ. अनुराग यांचा मुलगा मिहिर याच्या आजारपणात गोष्टी सांगता सांगता कोलंबस, वास्को द गामा, मॅगेलान यांनी केलेला सागरी प्रवास, त्यांच्या प्रवासाचा मार्ग, दिशा, त्यांना आलेला अनुभव, आलेल्या अडचणी हे सगळे नकाशावर समजववून सांगितले. सर्व कुटुंबच त्यात हारवून गेले! मुलाची जिज्ञासा, कुतूहल यामुळे डॉ. अनुराग यांची या विषयातील रुची वाढत गेली आणि सदर पुस्तकाचा जन्म झाला.

पृथ्वी धुंडाळणाऱ्या शोधनायकांची ही शोधगाथा भूगोल, इतिहास तसेच मराठी साहित्याच्या अभ्यासकाला उपयुक्त अशी आहे.

'अनंत अमुची ध्येयासक्ती' या कुसुमाग्रजांच्या ओळीप्रमाणे आकाशात नक्षत्रे आणि होकायंत्राशिवाय दुसरे साधन नसतांना या खलाशांनी सागराला गवसणी घालण्याचे साहस केले. संपत्ती, सोने, गुलामांची प्राप्ती याशिवाय स्वत:च्या जीवावर उदार होण्याइतकी कोणती प्रेरणा त्यांना मिळाली असेल? या सगळया वेड्या पीरांची कहाणी 'वसुंधरेचे शोधयात्री' या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते.

मध्ययुगीन कालखंडातील जगाच्या शोधमोहीमा मुख्यत: युरोपमधूनच सुरु झाल्या आहेत. त्यातही पोर्तुगाल व स्पेन या दोन देशांचे वर्चस्व शंभर वर्षापेक्षा जास्त होते. डच आणि ब्रिटिश हे देश नंतर सहभागी झाले. या सागरी मोहीमांची सुरुवात कशी झाली,विस्तार कसा झाला, त्यातून जगाच्या वेगवेगळया भुभागांचे आणि सागरी मार्गाचे शोध कसे लागले तसेच यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख व्यक्तिीरेखा (नायक) कोणत्या होत्या अशा रहस्यमयी वरुपाचे लेखन पुस्तकात आहे.

सुमारे दोन हजार वर्षातील सागरी शोधांचा इतिहास अतिशय प्रभावीपणे मांडण्यांत आला आहे. या पुस्तकातील मजकुराची विभागणी पाच (५) भागात करण्यात आली आहे.

पहिला भाग   - पार्श्वभूमी

दुसरा भाग    आफ्रिकेचा धांडोळा

तिसरा भाग   - भारतात आगमन

चौथा भाग    - अज्ञात खंडाचा अनपेक्षित शोध-अमेरिका

पाचवा भाग   - उर्वरित भूमीचा शोध व दोन्ही ध्रुवांपर्यंत मजल

प्रत्येक प्रकरणांच्या प्रारंभी देण्यांत आलेली  अवतरणं ही लक्षवेधी व समर्पक आहेत. तसेच विषयाला अनुसरुन फोटो व नकाशचा वापर मुबलक प्रमाणात केला आहे. जिथे शब्द फिके पडतात तिथे रेषा बोलतात.

'नवनिर्मितीचा मार्ग कुतूहलाने सुरु होतो' असे वॉल्ट डिस्नेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबर्ट आयगर हे नेहमी म्हणत या उदाहरणाचा  प्रत्यंतर या शोधयात्रींनी केलेल्या यात्रांमुळे पावलो पावली येतो.

जे लोक भूगोल शिकतात तेच लोक इतिहास घडवतात. 'वसुंधरेचे शोधयात्री' पुस्तक लिहून डॉ. अनुराग लव्हेकर यांनी तो घडवला असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. 'भूगोलाच्या रंगमंचावर इतिहासाचे नाटय सादर होत असते'. या विधानाची प्रचिती देणाऱ्या शोघनायकांची यात्रा आपल्याला या पुस्तकात मराठीत वाचायला उपलब्ध होणे ही भूगोल अभ्यासकांसाठी मेजवानीच आहे.

डॉ. अनुराग लव्हेकर यांनी पुस्तकात पाल्हाळविरहित वस्तुनिष्ठपणे मांडणी केली आहे. भाषा सहज सोपी असल्याने सामान्य वाचकांनाही ती समजते. ज्ञानाच्या पातळीजवळ हे पुस्तक घेवून जाते, ही या पुस्त्काची जमेची बाजू आहे. लेखकाच्या रंजक शैलीमुळे ही जग शोधणारी माणसे जगाच्या भौगोलिक रेषा पार करुन थेट आपली वाटतात.

'वसुंधरेचे शोधयात्री' पुस्तक वाचतांना कुसुमाग्रजांची 'कोलंबसचे गर्वगीत' ही कविता आठवत राहते.जणू शोध यात्रींच्या मनांतील भाव कवितेत उतरले आहेत.

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा,डळमळुदे तारे!

विराट वादळ हेलकावुदे पर्वत ढळुदे दिशाकोन सारे!

मार्ग ना आमुचा रोधू शकती ना धन,ना दारा घराची वा वितभर कारा

मानवतेचे निशाण मिरवू महासागरात जिंकुनी खंड खंड सारा!

चला उभरा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती कथा या खुळया सागराला

"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला!"

उपसंहारात लेखक म्हणतो पृथ्वी अजूनही पूर्णत: धुंडाळली गेलेली नाही. मुळात ज्ञान हे जसे अनंत आहे तशी मानवाची जिज्ञासाही अनंत आहे. आव्हानांना पेलत शोधाचा प्रक्रिया चालूच राहणार जगाच्या अंतापर्यंत !

वसुंधरेचे शोधयात्री

डॉ.अनुराग लव्हेकर

राजहंस प्रकाशन

पृष्ठ संख्या- ३३६

मूल्य - ५०० रुपये

- नीमा कुलकर्णी

मो.नं - ९९२३५९२२४७


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा प्रवास सुंदर आहे….

हा प्रवास सुंदर आहे….