हा प्रवास सुंदर आहे….
"मैत्र जीवाचे"
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे दि.११ व १२ मे २०२३ रोजी 'जिगीषा'
या नाटयसंस्थेला ४० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे वर्धापन दिन व आम्हा मित्र मैत्रिणींचा
स्नेह मेळावा (गेट टुगेदर) संपन्न् होतो आहे.या निमित्ताने हे मनोगत.
'जिगीषा' शी आपले एक खास नाते आहे आणि त्यातूनच आपला सांस्कृतिक
पिंड जोपासला गेला, हे आवर्जून सांगावेसे वाटते.आज मी जरी लेख लिहित असले तरी, लेखातील
भावना आमच्या 'स्त्री' मधील प्रत्येकीची आहे.आमच्या 'फ्रेंड्स, फिलोसॉफर व गाईड' प्रशांत,चंदूने
अर्थात 'जिगीषा' ने आम्हाला जे दिले तेच आज आमच्या प्रत्येकीच्या कृतार्थ जीवनाचे संचीत
आहे.
आज ख्यातनाम नाटय व चित्रपट लेखक प्रशांत दळवी व प्रतिभावान दिग्दर्शक
चंद्रकांत कुळकर्णी म्हणून ते मराठी नाटय-चित्रपट क्षेत्रात प्रसिध्द आहेत.याचा सार्थ
अभिमान व कौतुक आम्हाला आहेच; नितांत आदरही आहे,पण तरीही ते आमच्या साठी प्रशांत, चंदूच
आहेत.मैत्रीत कोणत्याही उपचारांची गरज आम्हाला वाटत नाही.
औरंगाबादेत मधे १९८२-८३ च्या कालावधीत सुमारे वीस पंचवीस जणांचा
आमचा 'ग्रुप' जमला.मग त्याचे 'जिगीषा' नामकरण
झाले. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात आम्ही सर्व भेटतच होतो.शहरातील नाटयप्रेमी
ग्रुप मधे सहभागी होत होते.अर्थात आमचे प्रमुख होते, प्रशांत आणि चंदू! नाटकाचा ध्यास
घेतलेले,आदर्शवादाने झपाटलेले दोन मित्र. त्या वयात दोघांचे वाचन अफाट,चौफेर आणि चौकस
होते.नेमकं काय आणि कसे वाचावे, हे आम्ही या दोघांकडून शिकलो. कार्ल मार्क्स प्रशांतनी
समजावून सांगीतला. समाजवादी विचारांची बैठकही त्यांच्या सहवासात तयार झाली,ती आजही
सोबतीला आहे.महाविद्यालयाच्या बाहेर उरलेल्या वेळात ऐकमेकांना भेटून चांगली नाटकं पाहणं,वाचणं,
कलात्मक चित्रपट(Art picture) पाहून त्यावर चर्चा करणं,वादविवाद करणं आवडीनं चालू होतं,या
प्रक्रियेत आम्ही वैचारिक रित्या समृध्द होत गेलो. प्रशांत चंदूची नाटकाच्या लिखाणावेळची
चर्चा ऐकण्यासारखी असायची.प्रशांतचे संहितालेखन,चंदू व इतर जाणकारांच्या सूचना, मग
दुरुस्ती,काही भागाचे पुनर्लेखन असे करत पक्की संहिता तयार होत असे.नाटकासाठी सभागृह(थिएटर)
कसे असावे,आपल्याला त्यात काय नवीन करता येऊ शकते,एखादा विषय नाटकाचा विषय कसा बनू
शकतो,त्याची प्रभावी मांडणी कशी करता येईल इ.गप्पांचा प्रवास एका सशक्त आदर्श रंगभूमीची
पायाभरणी बनत होता.
वक्तृत्व्,वादविवाद
स्पर्धेत त्यावेळी शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाचा संपूर्ण महाराष्ट्रात दबदबा होता. अपर्णा बोरकर,श्रुती
तांबे,अस्मिता राजूरकर या वादविवादपटूंसोबतच प्रशांत दळवी, चंद्रकांत कुळकर्णी,सरिता
कुळकर्णी,राधाकृष्ण मुळी,प्रतिक्षा लोणकर या 'जिगीषा' च्या सभासदांचा गौरवानं उल्लेख
करावा लागेल. त्या काळात युवक महोत्सव आणि स्नेह संमेलनातही 'जिगीषा' चेच वर्चस्व् होते.
८ मार्च १९८३- जागतिक महिला दिनानिमित्त् आमच्या 'जिगीषा' ग्रुपने
प्रशांतने लिहिलेली व चंदूने दिग्दर्शित केलेली 'स्त्री' नावाची एकांकिका सादर केली.
आम्ही ऊर्मिला कुळकर्णी,सरिता कुळकर्णी,सुषमा बिंदु,उज्ज्वला कुळकर्णी,प्रतिक्षा लोणकर,प्रतिमा
लोणकर,नीमा नेवासेकर,मंगल काटे, विजया बडवे,शुभांगी खारकर,नीता पानसरे व बाल कलाकार
आरती कुळकर्णी यांना घेऊन प्रशांत, चंदुने पथनाटयाच्या धर्तीवर ही एकांकीका बसवली होती.ज्यात
स्त्रियांवर होणा-या अन्यायाविषयी अतिशय संयमित व सूक्ष्मपणे भाष्य करण्यांत आले होते.निवेदन,संभाषण,कविता,गाणी,
आकाशवाणीवरील 'अवती-भवती'हा महिला विषयक कार्यक्रम अशा विविध कला प्रकारांचा वापर करण्यांत
करण्यांत आला होता.मुंबईत त्याचवेळी स्त्रियांच्या शारिरीक,मानसिक कौटुंबिक अत्याचारांविषयी
'मुलगी झाली हो..' या नाटिकंतून रोकठोक व सडेतोड बोलले जात होते. त्यावेळी आम्ही 'जिगीषा'
च्या 'स्त्री' एकांकिकेमधून हेच प्रश्न् पोटतिडकीने, पण वेगळया पध्दतीने सांगत होतो.स्त्रियांच्या
प्रश्नांकडे बघण्याची आमची दृष्टी तयार होत होती.
या एकाकिंकेचे आम्ही लॉन-प्ले,टेरेस-प्ले,स्ट्रीट-प्ले,कोणच्या घरात,कधी
गच्चीवर, झाडाखाली, अंगणवाडीत,यूथ हॉस्टेलमध्ये,वसतिगृहात,शाळा-कॉलेजमध्ये अशा वेगवेगळया
ठिकाणी जवळपास १२५ प्रयोग केले.चळवळ व कला
या दोन्ही गोष्टी वेगळया आहेत, हे समजायला सुरुवात झाली.कलाकारांकडून प्रभावीपणे अभिनय
करवून घेण्याची दृष्टी व कला चंदूकडे असल्याने आमच्याकडून तो त्याला अपेक्षित असणारा
अभिनय करवून घेत असे.कधी गोडीत तर कधी रागात.आम्ही चंदूला कायमच 'सर' पण बहाल केलं
आहे.प्रशांतचा धीरगंभीर वावरही खूप काही सांगत असे.
प्रत्येक प्रयोगाच्या आधी व नंतर प्रशांत चंदूच्या सूचना व मार्गदर्शनामुळेच
आमच्या प्रत्येकीत आत्मविश्वास,सभाधीटपणा,येऊन आत्मभान आलं.प्रयोगा दरम्यान स्टेजवर
कसे वावरायचे याचे चंदू प्रात्यक्षिक करून दाखवत असे.अभिनया सोबतच,उच्चार शास्त्राचे
धडेही चंदूने आम्हाला दिले.कलाकारांकडून हवा असलेला अभिनय करवून घेण्याचे कौशल्य चंदूकडे
आहे.आम्ही करीत असलेल्या एकांकिकेने जनमानसावर होणारा परिणामही अनुभवत होतो.अशा वातावरणात
आमची सांस्कृतिक व सामाजिक जाणीव विकसित होत
गेली.
मुंबईहून निघालेल्या स्त्री मुक्ती संघटनेच्या 'स्त्री मुक्ती यात्रे'
सोबत संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करण्याची संधीही 'स्त्री' ला मिळली होती.आमच्यासाठी
ही यात्रा ही अनुभव संपन्न् करणारी होती
प्रशांत,चंदूनी त्या दरम्यान 'स्त्री' सोबतच 'जिगीषा नाटय सहवास'(११
व १२ मे १९८३) 'प्रेक्षक सभासद योजना' असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून औरंगाबाद मधे
नाटकांसाठीचा प्रेक्षकवर्ग तयार करायला सुरवात केली.या प्रवासात ज्येष्ठ लेखक नाटककार
अजित दळवी यांनी लिहिलेलीं नाटकं व मार्गदर्शन मोलाचे ठरत होते.पुढे अजित दळवी व प्रशांत
दळवी या जोडीने अनेक दर्जेदार चित्रपटं आणि नाटकं केली आहेत. नवनवीन नाटक बसवणं( भुयार
गल्ली,मदर्स हाऊस,पावसाचे गाणं,पौगंड,स्मशानातलं सोनं इ.), बाहेरच्या नाटकांचे औरंगाबादला
प्रयोग करणं,नाटय महोत्सवाचे आयोजन,नाटय विषयक कार्यशाळा अशी दिवसरात्र धडपड चालू होती.
'जिगीषा' उपक्रमांसोबत सोबत या दरम्यान आमच्यातील काही जणींची शिक्षणावर
लक्ष केंद्रित करुन करीअर घडविण्याची धडपड चालू होती.
औरंगाबादच्या सांस्कृतिक वैभवात भर घालत असल्याचे समाधान होतं, पण
नवी क्षितिजंही या दोघांना खुणावतं होती. त्यावेळी प्रशांत चंदू खास नाटकं पाहण्यासाठी
औरंगाबादहून मुंबईला जात व नाटक पाहून परत येत.कदाचित कायम औरंगाबादला राहिलो तर आपल्यातही
'साचलेपण' येईल असे प्रशांत चंदूला तिव्रतेने वाटले असावे! आणि त्याक्षणी त्यांनी प्रतिक्षा
लोणकर,प्रतिमा लोणकर,अभय जोशी,मिलिंद जोशी,मिलिंद सफई,श्रीपाद पदमाकर,जितेंद्र कुळकर्णी,समीर
पाटील या मित्रमैत्रीणींसह मुंबईला जाण्याचा
निर्णय घेतला.तेव्हा त्यांच्या सोबत होती मराठवाडा विद्यापीठाची नाटयशास्त्राची पदवी,नवीन
नाटकांची स्वप्नं,आत्मविश्वास आणि चित्रपट-नाटयक्षेत्रात काही तरी रचनात्मक,नाविन्यपूर्ण
करुन दाखविण्याची असोशी!
औरंगाबाद ते मुंबई हा या सगळयांचा प्रवास सोपा नव्हता तर खडतर होता.कोणीही
'गॉडफादर' नसतांना असा निर्णय घेणे धाडसच होतं! या प्रवासा दरम्यानचा त्यांचा संघर्ष,त्यांचे कष्ट आम्ही जवळून पाहिले आहेत.प्रामाणिकपणा
व आदर्शवादाची मुल्यं उराशी असल्यांने चांगले काम व संधी मिळायला वेळ लागला.पण हळूहळू
ते मुंबईत स्थिरावले.स्वत:चे अढळस्थान निर्माण केले.प्रशांत,चंदूने 'जिगीषा क्रिएशन
प्रायव्हेट लिमिटेड'(मुंबईत गेल्यानंतरचे नामकरण) च्या माध्यमांतून प्रथम प्रायोगिक
रंगभूमीवर प्रयोग करुन ती व्यावसायिक रंगभूमीवर स्थिरस्थावर करुन भरभराटीला आणली. आणि
त्यानंतर घडलेला इतिहास सर्वज्ञात आहे.आज मराठी नाटय-चित्रपटसृष्टीत प्रशांत चंदूच्या
प्रत्येक कलाकृतीचीच चर्चा आहे.प्रशांतची सर्व नाटकं व चित्रपट चंदू सारख्या अभ्यासू
व कर्तृत्ववान दिग्दर्शकाने केली आहेत.अभिनेता ते संवेदनशील दिग्दर्शक चंद्रकांत कुळकर्णी
असा त्याचा प्रवास! या दोघांचे जुळलेले सूर ('टयुनिंग') जबरदस्त् आहे.इतकी वर्षे सोबत
असलेल्या लेखक-दिग्दर्शकाच्या जोडीच्या 'टयुनिंग' चे हे ऐकमेव उदाहरण आहे. मैत्री,बांधिलकी
असावी तर अशी! आज रंगभूमीवर जितकी अप्रतिम नाटकं आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
आले ते या जोडीचेच. प्रसिध्द लेखक,अभिनेते व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी आपल्या
एका लेखात या जोडीचा उल्लेख 'एकसंघ जुडी'च असा केला आहे.खरचं या दोघांचा हा प्रवास
देदीप्यमान,प्रेरणादायी आहे.
'स्त्री' मधे काम करणा-या आजच्या आम्ही :-
प्रतिक्षा लोणकर दळवी - लेखक प्रशांत दळवी सोबत लग्नानंतर मुंबईला स्थायिक.प्रतिक्षाने सुरवातीच्या काळात संघर्ष करीत हळू हळू अभिनय क्षेत्रात भरारी घेतली आहे.तिच्या वाटयाला आलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकेचे तिने सोनं केले. नाटक,चित्रपट तसेच दूरदर्शन व विविध वाहिन्यांवरील मालिकांमधुन लक्षवेधी भूमिका केल्यात व करत आहे.अनेक मानाच्या पुरस्कारांची ती मानकरी आहे.प्रतिक्षा आज चरित्र अभिनेत्री म्हणून प्रसिध्द आहे.
प्रतिमा लोणकर जोशी - अभिनेता अभय जोशी सोबत लग्नानंतर मुंबईला स्थायिक.सुरवातीला
काही काळ अभिनय क्षेत्रात काम.(नाटक,सिनेमा व मालिकांमधुन अभिनयात वेगळा ठसा.)प्रारंभी
च्या काळात अभिनेते,दिग्दर्शक अमोल पालेकर व चंद्रकांत कुळकर्णी यांच्या कडे दिग्दर्शनाचे
धडे गिरवून ती आता चित्रपट दिग्दर्शन क्षेत्राकडे वळली आहे.तिच्या पहिल्याच 'आम्ही
दोघी' या चित्रपटास पुरस्कार मिळाला.
सरिता कुळकर्णी पाटणकर - अभय पाटणकर
सोबत लग्नानंतर मुंबईला गेल्यावर सुरवातीला नाटकांत,मराठी मालिेकांत उल्लेखनिय कामं
केले. परंतु आरोग्य् विभागाच्या पूर्णवेळ नोकरीमुळे सातत्य राखणे जमलं नाही.त्यामुळे
अनेक चांगल्या भूमिका ती करु शकली नाही.पण आता सेवानिवृत्त् झाल्यानंतर ठाणे शहरातील
सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकंमात सहभागी असते.या सगळयां धावपळीत सरिताने गाणं जपलं
हे विशेष!
नीता पानसरे वाळवेकर - विकास वाळवेकर सोबत लग्नानंतर औरंगाबाद ला स्थायिक.
पत्रकारितेतील उच्च पदवी,एका खाजगी पत्रकारिता महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य,तसेच
काही काळ 'मिर्ची प्ल्स' रेडिओवर RJ म्हणून काम. अभिवाचन व सूत्रसंचालनात आपला वेगळा
ठसा उमटवला आहे.
सुषमा बिंदु देशपांडे - शाम देशपांडे
सोबत लग्नानंतर इंदौर ला स्थायिक.तेथील स्थानिक नाटयसंस्थां च्या नाटकांतून तिचा सातत्याने
सहभाग,व वैविध्यपूर्ण भूमिका करते.
उज्ज्वला कुळकर्णी परोपकारी - डॉ.दिपक
परोपकारी सह लग्नानंतर आधी जालना,मग बेलापूर (नवी मुंबई) येथे स्थायिक.मराठी,इंग्रजी
पुस्तकांचे अफाट वाचन.('जिगीषा' चा चालता बोलता ज्ञानकोश)पर्यटन हा तिचा छंद! नाविन्या
च्या ध्यासातून सध्या औरंगाबाद येथे दिपक सोबत आधुनिक व प्रायोगिक शेती (Dragon
Fruit) करते.
डॉ.ऊर्मिला कुळकर्णी काळे - संतुरवादक दिलिप काळे सोबत लग्नानंतर पुणे येथे
स्थायिक.सा.फु.पुणे
विद्यापीठात जैवमाहिती शास्त्राची(Bioinformatics) संशोधक.विषाणूंच्या उत्क्रांती आणि
प्रसार या विषयाचा विशेष अभ्यास आणि योगदान.सध्या विषाणूजन्य व इतर कर्करोगांवर संशोधन
सुरु.अनेक शोधनिबंध,पेटंट आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांमध्ये सहभाग.जगभरातून
विद्यार्थी तिच्याकडे संशोधनासाठी येतात.सा.फु.पुणे विद्यापीठ आणि यु.एस.एन. विद्यापीठ,नॉर्वे
येथे संशोधन आणि विविध प्रकल्प सुरु.आंतरराष्ट्रीय परिषदेत व्याख्यानासाठी खास निमंत्रित
केले जाते.
आरती कुळकर्णी खातु -.('स्त्री'तील
बालकलाकार) रोहन खातु सोबत लग्नानंतर पुणे
येथे स्थायिक.सध्या फर्ग्युसन महाविद्यालय,पुणे येथे सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत
आहे. ती पदवी पातळीवर राज्यशास्त्र विषय शिकवते.'स्त्रीवाद' हा तिचा अभ्यासाचा आणि
जिव्हाळयाचा विषय आहे.
मंगल काटे परळीकर - दिपक परळीकर
समवेत लग्नानंतर काही वर्षे सौदी अरेबियात वास्तव्य केले.भारतात येऊन हैदराबाद येथे
स्थायिक.सुरवातीला काही काळ 'ब्युटिक' चालवले.सध्या ती हैदराबाद येथे एक 'म्युझिक कॅफे'
चालवते.
शुभांगी मांडे खारकर - पुणे येथे
स्थायिक झाल्यानंतर काही काळ 'ब्युटीपार्लर' चालवले,तसेच पुणे आकाशवाणीवर उदघोषक म्हणून
काम,पत्रकारीतेचा अभ्यासक्रम पूर्ण करुन MIT कॉलेज,पुणे येथे अध्यापनाचे काम केले.विविध
नाटकांत सहभाग.विविध वृत्तपत्रं व मासिकांतून कथा,कविता व ललित लेखन.नुकतेच तिच्या ३ पुस्तकांचे प्रकाशन झाले.
नीमा नेवासेकर कुळकर्णी - औरंगाबाद
मधे काही काळ 'दै मराठवाडा' त पत्रकार तसेच आकाशवाणीवर उद्घोषक म्हणून काम केले.संजीव
कुळकर्णी सोबत लग्नानंतर नांदेड येथे स्थायिक. एका खाजगी महाविद्यालयात नोकरी.पत्रकार
संजीव कुळकर्णी समवेत 'अभंग पुस्तकालय' व 'अभंग प्रकासना'स सुरुवात. विविध सामाजिक,सांगितिक,
साहित्यिक, सांस्कृतीक, व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन.तसेच दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन.प्रसंगानुरुप
साहित्यिक कार्यक्रमांचे सुत्रसंचालन व अभिवाचन
सदर लेख लिहितांना 'स्त्री' च्या काही सभासदांची माहिती अनावधानं
राहून गेली असेल, काहीं जणींची माहिती जागे अभावी त्रोटक आली असेल तर त्यासाठी मी दिलगीरी
व्यक्त करते. मैत्री जिंदाबाद!
प्रशांत चंदूनी त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकलाच समृध्द केले,
अंगभूत कलागुणांना वाव दिला,पंखात बळ दिले.आजुबाजुला भरकटलेल्या वातावरणात खंबीर उभं
राहण्याचे साहस दिले.आज आम्ही सर्व जणी आपापल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी पणे कार्यरत
आहोत,याची बीजंही 'जिगीषा' तच सापडतात. समाधान या गोष्टीचे की, आमची मैत्री इतक्या
वर्षानंतर दृढ आहे. 'मैत्रीच्या धाग्याने बांधलेले कोठेही गेले तरी ते जवळच असतात'.
प्रत्येकाच्या सुखदु:खाच्या प्रसंगात आम्ही सर्व आर्वजून जमतो.मोबाईल मुळे रोज भेट
होतेच.वर्षातून एक स्नेहमेळावा (गेटटुगेदर) आसतोच,प्रत्येक जण आपल्या व्यस्त् वेळापत्रकांतून
वेळ काढुन येतो.आणि काही क्षण रमतो,विसावतो.खरच जीवनात 'मैत्री' किती समृध्दी आणते!
संदर्भ व छायाचित्र सौजन्य् :- गुगल व सरिता कुलकर्णी पाटणकर
नीमा कुळकर्णी
मो.नं :-
९९२३५९२२४७


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा