हा प्रवास सुंदर आहे……
तोच मी
प्रभाकर पणशीकर! मराठी नाटयसृष्टीतील
एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व.प्रभाकर पणशीकर नाटयवर्तुळात 'पंत' या नावाने ओळखले
जात. १४ मार्च हा पंतांचा जन्मदिवस. त्या दिवशी प्रसारमाध्यमांनी या नटवर्याची दखल
घेतलेली दिसली नाही. राजहंस प्रकाशनाच्या 'तोच मी'या आत्मचरित्राच्या जाहिरातीत
मात्र आर्वजून उल्लेख होता. या निमित्ताने प्रभाकर पणशीकरांच्या आठवणी ताज्या
झाल्या.अशा नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांचे तीन कार्यक्रम घेण्याचा बहुमान नांदेड
च्या 'अभंग पुस्तकालया'ला मिळाला.पहिल्या भेटीतच आमचे पंतांशी सूर जुळले.
'नाटयसंपदा' नावाची नाटयसंस्था स्थापन करुन
प्रभाकर पणशीकरांनी अनेक दर्जेदार अशा ४१ नाटकांची निर्मिती केली. १९६३ ते १९९९
दरम्यान एक निर्माता, दिग्दर्शक व नट म्हणून प्रभाकर पंतांनी मराठी नाटयसृष्टी
अक्षश: गाजवली. 'अश्रुंची झाली फुले', 'कटयार काळजात घुसली' आणि 'संत तुकाराम' ही
तीन नाटकं एकाच दिवशी तीन नाटयगृहात लावण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आजही आहे. प्रारंभी वयाच्या ऐन
पंचवीशीत मो.ग. रांगणेकर यांच्या 'नाटयनिकेतन' या संस्थेतून नाटयजीवनास प्रारंभ
केला. मो.ग.रांगणेकरांना प्रभाकर पणशीकर गुरुस्थानी मानीत. पणशीकरांमधील नटाला
पैलू रांगणेकरांनीच पाडले होते.'माझे भाग्यविधाते' म्हणून त्यांचा उल्लेख पंत
गौरवाने करीत.आपल्या आत्म्चरित्राची अपर्णपत्रिका प्रभाकर पणशीकरांनी आपले गुरु
मो.ग.रांगणेकर यांना त्यांच्या जन्मश्ताब्दी निमित्ताने अर्पण केली आहे.
"आपल्या दैदिप्यमान तेजाने मराठी
रंगभूमी झळाळून टाकण्या-या प्रभाकर पणशीकर यांची कारकीर्द 'बॅकस्टेज' पासून सुरु
झाली.पण पुढे संधीचे सोने करत ते एक समर्थ अभिनेते बनले आणि मग सक्षम नाटय् निर्माता अशीही त्यांची ओळख झाली. संवेदनशील सशक्त अभिनयाने रसिकांची मने
जिंकतानाच शिस्त वक्तशीरपणा, स्वच्छ वाणी दमदार आवाज, निर्मळ आचारसरणी या
माध्यमांतूनही त्यांनी नाटयसृष्टीसमोर आदर्श उभा केला". पणशीकर गौरवग्रंथातील
हा उतारा पंताचे मोठेपण सांगण्यास पुरेसा आहे.
राजहंस प्रकाशन, पुणे, दर्पण प्रतिष्ठान व
अभंग पुस्त्कालय नांदेड यांच्या वतीने मराठी रंगभूमीवरील श्रेष्ठ आणि जेष्ठ नेते
'तोच मी' म्हणत नांदेडच्या रसिकांच्या भेटीला आले. पटकथाकार विजय कुवळेकर यांच्या
लेखणीतून साकारलेल्या 'गोष्ट पणशीकरांची' हा आगळा वेगळा कार्यक्रम सादर झाला. २०
मे २००६ रोजी शंकरराव चव्हाण सभागृहात (सुमारे सहा महिन्यापूर्वी पंतांच्या हस्ते
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचे उदघाटन झाले होते.) झालेल्या या
कार्यक्रमात प्रारंभी प्रभाकर पणशीकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त् मानपत्र देवून गौरव करण्यांत आला. जेष्ठ वयोवृध्द रंगकर्मी पदमाकर लाठकर यांच्या
हस्ते नटश्रेष्ठाचा गौरव करण्यांत आला. मराठवाडयांत प्रथम असा भव्य नागरी सत्कार
करण्याचे श्रेय नांदेडच्या 'अभंग'चे.या वेळी व्यासपीठावर तत्कालीन जिल्हाधिकारी
राधेशाम मोपलवार, नाटय संमेलनाध्यक्ष प्रा.दत्ता भगत, पत्रकार व लेखक विजय
कुवळेकर, संजीव कुलकर्णी, श्याम देशपांडे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विस्म्ररणात गेलेल्या नांदेडच्या पद्माकर लाठकर या वयोवृध्द कलावंताचाही यथोचित सन्मान आम्हाला करता आला याचे समाधान वाटले.
पद्माकर लाठकर व प्रभाकर पणशीकर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विजय कुवळेकर यांच्या सशक्त लेखणीतून
साकारलेल्या 'गोष्ट पणशीकरांची' या कलाविष्कारातून प्रभाकर पंतांच्या नाटय प्रवासाचे
रसिकांना उत्कट दर्शन घडले. 'इथे ओशाळला मृत्यु', 'तो मी नव्हेच','थँक्यु मिस्टर ग्लाड',
'अश्रुंची झाली फुले' इ. नाटकांतील प्रवेश सादर करण्यांत आले.प्रवेशा दरम्यान ओवघत्या
शैलीतील निवेदकांच्या निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. 'लखोबा लोखंडे', 'राधेश्याम
महाराज', 'प्रोफेसर विदयानंद', साकारतांना प्रभाकर पंतांनी जुन्या स्मृतींना उजाळा
दिला.'इथे ओशाळला मृत्यु' मधील औरंगजेबाचा प्रवेश झाल्यानंतर त्यांनी हात उंचवून रसिकांना
अभिवादन केले. सुमारे दोन तास चाललेल्या नाटय प्रवेशाच्या माध्यमातून प्रभाकर पंतांचे
नाटय जीवन उलगडले गेले. पंत व कुवळेकर यांच्या चमुने हे शिवधनुष्य लिलया पेलले.
![]() |
| अश्रुंची झाली फुले मधील प्रोफेसर विदयानंद |
प्रभाकर पणशीकर यांचे आत्मचरित्र 'तोच मी' या नावे राजहंस प्रकाशनाने
प्रसिध्द केले. या पुस्त्काचा प्रकाशन सोहळा 'अभंग पुस्त्कालयाने' नांदेड येथे दि.२२
डिसेंबर २००६ रोजी आयोजीत केला. 'अभिवंदन सोहळा' या कल्पक नावाने प्रकाशनाचा कार्यक्रम करुन आम्ही प्रभाकर
पंतांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. योगायोगाने त्यावर्षीचा महाराष्ट शासनाचा 'जीवन गौरव
पुरस्कार' प्रभाकर पणशीकर यांना जाहीर झाला होता.आणि सदर पुरस्कारास शासनाने 'प्रभाकर
पणशीकर जीवन गौरव पुरस्कार' असे नाव देण्याचे निश्चित करण्यांत आल्याने आनंद व्दिगुणीत
झाला होता.या कार्यक्रमास नांदेडच्या रसिकांनी अक्षश: डोक्यावर घेतले. हे श्रेय प्रभाकर
पणशीकर यांनाच जाते. प्रारंभी मंचावरील पडदा वर जाताच पणशीकरांच्या नाटयसेवेचा गौरव
करणा-या मानपत्र वाचनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिध्द कवी
फ.मु.शिंदे यांच्या हस्ते मानपत्र देवून पंतांचा सत्कार करण्यांत आला. सत्काराच्या
क्षणी संयोजकांनी 'क्षण आला भाग्याचा……' हे मो.ग. रांगणेकर (नाटयनिकेतन) यांच्या 'कुलवधु'या
नाटकातील पद वाजवताच पंतांचे डोळे कृतज्ञतेच्या भावनेने भरुन आले.व्यासपीठावर जेष्ठ
समाजवादी नेते बापुसाहेब काळदाते तत्कालीन जिल्हाधीकारी राधेश्याम मोपलवार उपस्थित होते.
सोहळयांत पंतांनी श्रोत्यांशी मुक्त संवाद
साधला.नट कसा असला पाहिजे? त्याचे कर्तव्य कोणते? त्याचे सामर्थ्य् काय असायला
हवे? या पैलूंवर पणशीकर मनमोकळे बोलेले. लेखक प्र.के.अत्रे यांच्या 'तो मी नव्हेच'
या नाटकाचे २५०० प्रयोग झाले. या नाटकातील पंचरंगी भूमिका ही
नाटय इतिहासात मैलाचा दगड ठरली. मराठी रंगभूमीला संजीवनी देण्याचे काम अत्रे,
रांगणेकर, पणशीकर या त्रयीने केले.पणशीकर म्हणाले की, या नाटकाने मला चोखंदळ,
वक्तशीर, शिस्तबध्द बनवले. ५० वर्षात माणसे आणि त्यांचे प्रेम मिळाले, हाच माझा
गौरव आहे. तुम्हा रसिकांची मानसपूजा हेच मी माझे कर्तव्य समजतो अशी रसिकांना
भावनिक साद घालताच सभागृहातील प्रत्येकाचे डोळे पाणावले.
अध्यक्षीय समारोपात फ.मु.शिंदे यांनी 'तोच
मी' या आत्म्चरित्राचे रसग्रहण केले. राधेश्याम मोपलवार यांचेही समायोचीत भाषण
झाले.या प्रसंगी 'तोच मी' या आत्मचरित्राची प्रथम नोंदणी करणा-या पाच वाचकांना
पणशीकरांच्या हस्ते पुस्तकाची प्रत देण्यांत आली.
सदर कार्यक्रमा दरम्यान प्रभाकर पणशीकर
यांनी 'नाटयसंपदा' या संस्थेच्या नाटकांचा एक महोत्सव 'अभंग पुस्तकालया'नी
नांदेडला आयोजित करावा अशी इच्छा व्यक्त केली. आम्ही तो आमचा बहुमान समजलो. सुमारे
वर्षभरातच 'अभंग पुस्तकालया'ने नांदेडचे जेष्ठ नाटय कलावंत प्रभाकर गादेवार
यांच्या सहकार्याने प्रभाकर पणशीकर यांच्या प्रमुख भूमिका व दिग्दर्शन असलेले 'तो
मी नव्हेच', 'इथे ओशाळला मृत्यु' या दोन व प्रभाकर पणशीकर यांनी दिग्दर्शन केलेले
'अवघा रंग एक झाला' या संगीत नाटकाचा महोत्सव आयोजीत केला. वयाच्या ७५ व्या
वर्षीही प्रभाकर पणशीकर यांचा अभिनय, उत्साह, स्मरणश्क्ती तरुण नटालाही
लाजवण्यासारखी होती. दैवी देणगी लाभलेले 'नटसम्राट'च भासत होते. नाटकाच्या
मध्यंतरात लॉटरी (सोडत) पध्दतीने भाग्यवान प्रेक्षकांची निवड करुन प्रभाकर
पणशीकरांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन त्यांचा सत्कार करण्यांत आला. या अभिनव कल्पनेचे
पंतांनी कौतुक केले.रसिक प्रेक्षक हा मायबापच असतो, त्याचा सन्मान केलाच पाहिजे
असे मत प्रभाकर पणशीकरांनी या प्रसंगी व्यक्त केले.
'अवघा रंग एक झाला' या तिस-या दिवशीच्या
संगीत नाटकात पंडीत राम मराठे यांची प्रमुख भुमीका होती.पंतांचे चिरंजीव
पं.रघुनंदन पणशीकर यांची या नाटकातील भूमिका लक्षणीय होती. अर्थातच तीनही नाटकांचे
प्रयोग चांगले झाले .नांदेडच्या रसिक प्रेक्षकांनी मनांपासून दाद दिली.
जीवनभर रंगभुमीवरचे अनभिषक्त सम्राट बनून
पंचाहत्तर वर्षे रंगभूमीची अखंड सेवा केली.परमेश्वराकडे 'मला पुन्हा नटाचाच जन्म
दे आणि तोही या मराठी भूमीतच दे!' अशी विनवणी करणा-या या नटवर्याने कृतार्थभावाने
दि.१३ जानेवारी २०११ रोजी जगाचा निरोप घेतला. जग चालतच राहणार या रंगमचावर अनेक
चांगले नट रंगभूमीची सेवा करीतच राहणार. पण प्रभाकर पंतांसारखा नट होणे नाही.
२७ मार्च जागतिक रंगभूमी
दिन आहे. प्रभाकर पणशीकरांसोबतच मराठी रंगभूमीच्या ज्ञातअज्ञात
रंगकर्मींच्या स्मृतीस विनम्र अभिवंदन.
- नीमा कुलकर्णी.
- छायाचित्रे - सौजन्य होकर्णे बंधु, नांदेड.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा