हा प्रवास सुंदर आहे……
जागर साहित्याचा, उत्सव मैत्रीचा!
सुप्रसिध्द लेखिका व कवयित्री शुभांगी मांडे-खारकर
हिच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन व षष्ठब्दीपूर्ती सोहळा दि.२ एप्रिल २०२३ रोजी अंबर
हॉल कोथरुड पुणे येथे पार पडला.या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ
पत्रकार मधुकर भावे,दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी व प्रतिमा जोशी लेखिका शुभांगी मांडे-
खारकर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी
तिनही पाहूण्यांची पुस्तकावर भाष्य करणारी समायोचित भाषणे झाली.लेखिका शुभांगी मांडे-खारकर
हिचे भावपूर्ण मनोगत झाले.शुभाच्या मुली नेहा,मोनिका,व जावई हर्षद,ऋषिकेश यांच्या पुढाकारातून
झालेला हा कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात नातेवाईक,मित्रमैत्रिणी यांच्या उपस्थितीत
पार पडला.सदर कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन नेहा मांडे हिने केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभाने नातेवाईक व 'जिगीषा'चा स्नेह मेळावाच घडवून आणला.शुभाच्या प्रेमामुळे आम्ही सर्व प्रशांत दळवी, चंदकांत कुळकर्णी,प्रतिमा व अभय जोशी,ऊर्मिला व दिलीप काळे,मनीषा व मिलींद जोशी,नंदु माधव,संध्या व विवेक पत्की,संगीता कुळकर्णी,दिपाली व श्रीपाद पदमाकर,आणि मी तिच्या आनंदात काही क्षण रमलो,सुखावलो.
पुस्तकांचे
अंतरंग
१. गोफ आठवणींचा……..
सतत
अवती भोवती पिंगा घालणा-या आठवणींचा विणलेला
गोफ शुभा आपल्या समोर वाचायला ठेवते.हे पुस्तक दैनिक 'प्रहार' वृत्तपत्रात लिहिलेल्या
स्त्ंभ् लेखांचे संकलन आहे.
आपल्या
छोटेखानी प्रस्तावनेत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे लिहितात या लेखसंग्रहातील लेख विविध
स्वरुपाचे आहेत.त्यात चिंतन आहे,निरीक्षण आहे,विश्लेषण आहे.संसारातील अडचणींवर उपाय
आहे.पुस्तकातील प्रत्येक (३४) लेख लेखिकेच्या मनांतून आलेला आहे आणि मग शब्द कागदावर
उतरलेले आहेत.त्यामुळे ते मनाला भिडणारे आहेत.भाऊसाहेब खांडेकरांनी सांगितलेल्या अवतरणाचा
भावे साहेब दाखला देतात.'रातराणीच्या सुंगधाची चर्चा करायची नसते,अनुभूती घ्यायची असते'.याची
प्रचीती पुस्तक वाचतांना येते.
तुझ्याशिवाय….
पहिलाच पत्ररुपी लेख वैयक्तिक आहे.तो वाचताना काळीज
पिळवटून जातं. मकरंद च्या जाण्याने शुभाच्या हसत्या खेळत्या संसारावर विषण्ण्ता आली..शुभा
व मुली सैरभैर झाल्या.कुठल्याही अडचणीत मकरंदच शुभा व मुलींसाठी भक्कमपणे उभं असणारं
गुगल (शुभाचा शब्द)आता कायमचं बंद झालं होतं.पण शुभा धीराची! दोन गोड मुली नेहा,मोनिका
व जावई हर्षद (तेव्हा नेहाचेच लग्न झाले होते)बहिणी बेबी,छाया,दोन्ही भाऊजी यांच्या
सोबतीने सावरली.आयुष्याची सुरवात तिने नव्याने सुरु केली.वाचन,लेखन,कवितेत,मित्र मैत्रिणीत
व पर्यटनात रमली. लेखात मकरंदशी संवाद साधल्या प्रमाणे शुभा त्याच्या सहवासातील क्षण
पुन्हा ताजेतवाने करते.कधी अनुभवते मुलींसोबत घालवलेले त्यांचे चौघांचे क्षण तर कधी
फक्त् त्या दोघांचे! काय नव्हते त्या क्षणात,गाणं,वाचणं,फिरणं,खाणं आणि जगणं एकमेंकामध्ये
छान मिसळून गेलं होतं.पावसाळयातील इंद्रधनुष्यासारखं पण मकरंद नाही हे सत्य् शुभा
व मुलीं हळूहळू स्वीकारतात. उलट आम्ही तिघी एकमेकींच्या सोबत आहोत तुच तिथे एकटा आहेस,सांभाळून
रहा असे भाबडे पणाने शुभा मकरंदला विनवते.
'बाकी क्षेम' असा मायना असलेला पत्ररुपी लेख हा पूर्वी
असणारं पत्राचे मह-त्व विषद करतो. मोबाईल,इंटरनेट,मेल,मेसेजेस इ. त्वरित संपर्काचं
साधनं असले तरी पत्राची मजा औरच होती.पत्रं,शुभेच्छापत्रे,पत्रिका म्हणजे आठवणींचा
खजीनाच होता. आज आपण या आनंदाला पारखेच झालोत!
पुस्तकातील
सर्व लेख चांगले आहेत,पण 'बंद दाराआडची कहाणी', 'दत्तक मुल', 'काटेरी मुकुट', 'तिचं
काय चुकलं', 'निर्मळ मैत्री'… 'निरपेक्ष प्रेम', 'कन्यादान' या लेखांचा आर्वजून उल्लेख
करावा लागेल.
'चैत्रगौर,कैरीची
डाळ आणि पन्हं.., 'दिन दिन दिवाळी', 'मामाचा वाडा' हे लेख् वाचकानां बाळपणत घेऊन जातात.
गोफ आठवणींचा…. शुभांगी मांडे खारकर चा पहिलाच संग्रह असला तरी तिच्यात भावी प्रतिभासंपन्न् लेखिका उदयाला येणार आहे याचा विश्वास ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आपल्या प्रस्तावनेत व्यक्त करतात.
* गोफ आठवणींचा……
लेखिका - शुभांगी मांडे-खारकर
डिंपल प्रकाशन
पृ.१२१ किंमत - २००/-
२. बेघर
प्रारंभीच शुभांगी शब्दांची आर्जव करुन
त्यांचे आभार मानून धन्यवादही देते.
कथासंग्रहात
एकूण १२ कथा आहेत. त्यातील काही कथा लघुकथा वाटाव्यात इतक्या लहान आहेत. बहुतेक सर्वच
कथा दैनिक वृत्तपत्र अथवा दिवाळी अंकात प्रसिध्द झालेल्या आहेत.
'अपराधी','गुरुदक्ष्रिणा','आई
परत भेटली','तूच माझी सावित्री' या कथांतून भेटणा-या नायिका सुंदर,सोज्वळ,संस्कारी
असल्या तरी आत्मभान असण-या आहेत.प्रत्येकीला स्वता:ची मतं आहेत,त्या मतांवर ठाम असतात.
'अतृप्त्','निर्णय','बेघर' मधील नायिका सुंंदर,कर्तृत्ववान
असूनही मनानं कमजोर,परिस्थितीसमोर थेाडया शरण जाणा-या,हतबल निराश वाटतात.हा त्यांच्यावर
लेखिकने केलेला अन्याय तर नाही ना? असा प्रश्न मनांत येतो.
'व्हॉटस ॲप,माय डियर आजी'! या कथेत आजी नातीचे
सुरेख कंगोरे चित्रित केले आहे.मोबाईल मुळे त्यांच्यात नात्याची वीण दृढ होत जाते.नातीच्या
आग्रहासाठी आजी काहीशा घाबरत,संकोचत व्हॉटस ॲप मेसेज चे तंत्र शिकून घेतात त्या दुनियेत
हरवून जातात. दुरावत चाललेली नाती परत भेटल्याने आजी सुखावतात,त्यांची एकटेपणाची पोकळी
भरुन निघते.लेखिका तंत्रज्ञान अवगत करायला वयाचे बंधन नसते हा संदेश लेखिका देऊ पाहते.
* बेघर
लेखिका - शुभांगी मांडे-खारकर
बुकमार्क पब्लिकेशन
पृ. १४३ किंमत -१८०/-
३. कवडसे
शुभांगीचे
हे तिसरे पुस्तक. दैनिक 'प्रहार' वृत्तपत्रातील 'आठवणींचा हिंदोंळा' या लेखमालेतील
लेखांचे संकलन.
पुस्तकाच्या
प्रारंभीचे दोन लेख 'ती'च्या जिद्दी गोष्ट… आणि 'आमचे लढवय्ये दादा' हे आपल्या आई-वडिलांवरचे
आहेत.मकरंद गेल्यानंतर शुभा ज्या हिमतीने आणि धडाडीने उभी राहिली याची बीजं आपल्याला
या दोन लेखात सापडतात.
मराठवाडा
मुक्ती संग्रामातील शुभाच्या बाबांचे योगदान मोठे आहे.आई पण या लढयात सक्रिय होती.
त्यांना तुरुंगवासही झाला होता.पण दोघांनीही आपल्या या कार्याचा गवगवा केला नाही.माणसं
जोडणं हा दोघांचा अंगभूत गुण होता.
'सरली
तरी उरली दिवाळी' या लेखात शुभा बदलत चाललेल्या सामाजिक,आथिर्क,कौटुंबिक व्यवस्थेमुळे
अत्यानंद देणा-या दिवाळीचा गोडवा हरवून गेला असल्याची खंत लेखिका व्यक्त करते.उरल्यात
फक्त आठवणी आणि खाणा खुणा! 'सरली कुठे? अजूनही उरली आहे दिवाळी… या आपल्या भावपूर्ण
कवितेतून शुभा आशावाद व्यक्त करते.आणि विचारते लावूयात का मनांत एखादी पणती आपल्याच
आनंदासाठी,मनातल्या दिवाळीसाठी?
'पाऊस
अंगणातला….. पाऊस मनांतला' हा लेख आपल्यालाही मनसोक्त भिजण्याची अनुभूती देतो.पावसाच्या
सरींसारखी लेखातील शुभाची कविता तनांमनांवर बरसून जाते.
'थँक्यू
तेंडुलकर' लेखात शुभा आपल्या औरंगाबादच्या घरातील तेंडुलकरांच्या 'ग्रेट' भेटीचा प्रसंग
सांगते.प्रसिध्द लेखिका व कवयित्री जयश्री खारकर च्या आमंत्रणावरून तेंडुलकर घरी आले
होते.गप्पांच्या ओघात "तुझ्या बहिणीप्रमाणे तूही कविता करतेस का नाही"? असा
प्रश्न तेंडुलकरांसारख्या एवढया मोठया लेखकांनी विचारताच गोंधळलेल्या शुभाने विनम्रपणे
नाही असे उत्तर दिले होते.पण कदाचित कवीची असोशी तेंडुलकरांना शुभाच्या डोळयांत दिसली
असावी.ते म्हणाले "नक्की एक दिवस तू कविता करशील,तेव्हा मला न विसरता पाठव"पुढे
एका वळणावर,शुभाला कविता भेटली आणि ती तिचीच होऊन राहिली.आज कविता आहे,पण वाचायला
तेंडुलकर नाहीत याचे शल्य शुभाला आहे.म्हणूनच ती प्रामाणिक आणि मनापासून म्हणते
'थँक्यू तेंडुलकर'
सदर
लेखसंग्रहात एकूण ३४ लेख आहेत.सर्वच लेख मनाच्या गाभा-यातून उतरलेले आहेत.भाषेचा गोडवा,उत्कटता,सकारात्मकता
या गुणांमुळे लेख सरस झाले आहेत.
प्रत्येक
लेखाच्या शेवटी शुभा आपल्या समोर कधी प्रश्नांतून तर कधी अवतरणांतून आशावाद पेरते.
मला वाटतं ही सकारात्मक गोष्टींची सुरुवात आहे.
* कवडसे
लेखिका -शुभांगी मांडे-खारकर
डिंपल प्रकाशन
पृ.११६ किंमत - २००/-




व्वा! सुंदर!
उत्तर द्याहटवा