हा प्रवास सुंदर आहे……

                       


   अभंग पुस्तकालय, नांदेड या आमच्या उपक्रमास यंदाच्या गुढी पाडव्यास १७ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आमच्या प्रवासाचे सिहांवलोकन!

    ग्रंथविक्री हा संकुचित उद्देश ठेवता, वाचनसंस्कृती संवर्धन व संस्कृतिक चळवळ सुरु करणे हा आमचा मानस होता. मनांत एक खंत होती, १९५५-१९७५ या कालावधीतला सुवर्णकाळ ओसरुन गेला होता. कुरुंदकर गुरुजी, शेवाळकर, प्राचार्य बारलिंगे, प्रा.शिरवाडकर, स.रा.गाडगीळ, वे.शा.सं.कस्तूरे, इतिहासाचार्य कानोले, चित्रमहर्षी वसेकर, गानतपस्वी गुंजकर अशी दिग्ग्ज सारस्वतांची मांदियाळी ओसरली होती. साहित्य संस्कृतिक क्षेत्राला आलेली मरगळ वेदनादायी होती. पण कुठल्याही प्रकारचा तक्रारीचा सूर आळवत बसण्यापेक्षा आम्ही प्रत्यक्ष कृतीला सुरवात केली. बिरबलाच्या गोष्टी प्रमाणे आधीच्या सांस्कृतिक रेषेपुढे आम्ही 'अभंग पुस्तकालयाची' रेष ओढली, जिच्यामुळे नांदेडचे सांस्कृतिक वैभव वापस यायला सुरवात झाली. जेष्ठ पत्रकार व संपादक सुधाकरराव डोईफोडे यांनी 'अभंग' शिर्षकाच्या त्यांच्या अग्रलेखातही (दै.प्रजावाणी) असेच म्हटले होते.

     'अभंग' व्यासपीठावर गेल्या सोळा वर्षात साहित्य, समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रातील दिग्गजांना आमच्या व्यासपीठावर आपणासारख्या चिकित्सक, चोखंदळ, रसिक श्रोत्यांसमोर आणता आले, हा आमच्यासाठी अमूल्य ठेवा होय.

    विझत चाललेल्या व्यासपीठांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही कंबर कसली. अभ्ंगच्या व्यासपीठावरुन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सांगितीक, आरोग्य इ. विषयावर कधी व्याख्यान, तर कधी प्रकट मुलाखतींचा कार्यक्रम, तर कविता वाचनाचा कार्यक्रम, नाटयप्रयोग अशा वैविध्य्‍पूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा प्रयत्न केला. ग्रंथोत्सवासारखा अनोखा प्रयोगही केला. नांदेडच्या रसिक श्रोत्यांचे चौफर सांस्कृतिक उन्न्यन करण्यांतूनच वाचनसंस्कृती जोपासली जाईल, असा विश्वास आम्हाला होता.

    डॉ.अभय बंग, डॉ.नरेंद्र जाधव, ॲड.उज्वल निकम, अच्युत गोडबोले, मधुकर भावे, पी.साईनाथ, प्रदीप लोखंडे, यांची व्याख्याने अनिल अवचट, यशवंतराव गडाख, डॉ. रवी बापट, माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण, तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुलाखतींचे कार्यक्रमही गाजले. कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या कविता,' तो प्रवास सुंदर होता' हा कुसुमाग्रजांच्या कवितेवरील व माझे जीवन गाणे हा मंगेश पाडगांवकर यांच्या कविता, गाणी व मुलाखतीचा कार्यक्रम तर रसिक मायबापांनी अक्षरश: डोक्यावर घेतला.

     'अभंग पुस्तक भिशी', 'शामची आई-माझ्या घरी' हा उपक्रम, 'व्हाय नॉट आय', 'प्रयोगातून विज्ञान' आणि  'लवसा' या पुस्तकांवरील निबंध स्पर्धेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जणू 'वाचते व्हा,लिहिते व्हा' हा सांस्कृतिक संदेश देण्याचा प्रयत्न!

     आता तर 'अभंग'ने 'अभंग प्रकाशन'या नावाने प्रकाशन संस्था सुरु करुन विविध विषयावरील संदर्भ मुल्य असलेल्या ग्रंथांचे प्रकाशन केले आहे.यादी खूप मोठी आहे. उदाहरणा दाखल समग्र अनंत भालेराव, निवडक तु शं, संघर्षयात्री, नव्याने शोधतानां, संसदरत्न, मी आनंदयात्री अशी कितीतरी नावं देता येतील. प्रसिध्द लेखक संजय भास्कर जोशी यांच्या मदतीने तयार केलेली 'अभंग डायरी'ने तर इतिहास घडवला.

      या नाविन्यशील उपक्रमांमुळे 'अभंग'ने आपले सांस्कृतिक क्षेत्रातले कृतीशील योगदान सिध्द केले आहे. पण वाचनसंस्कृती वृध्दिंगत करण्याच्या आघाडीवर आणखी पुष्क्ळ काही करावे लागणार आहे. जे काही हातून घडले, त्यात आमचे वाचक, ग्राहक आणि हितचिंतकांचे मोठे योगदान आहे. आम्ही या सर्वांचे तसेच आमच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून आमचा उत्साह वाढविणा-या साहित्यप्रेमी श्रोत्यांचेही ऋणी आहोत.

    -  नीमा कुलकर्णीमाे.नं- ९९२३५९२२४७

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा प्रवास सुंदर आहे….

हा प्रवास सुंदर आहे……

हा प्रवास सुंदर आहे……