हा प्रवास सुंदर आहे…..

     श्यामची आई-माझ्या घरी‌

       'अभंग पुस्तकालया'च्या 'श्यामची आई-माझ्या घरी‌' ह्या अभिनव उपक्रमास प्रारंभीच आदरणीय ग.प्र.प्रधान यांनी पाठराखण करुन आमचा उत्साह वाढवला होता. या निमित्ताने त्यांची अनौपचारिक झालेली भेट ही मार्गदर्शक होती. प्रधान मास्तरांनी उपक्रमाच्या माहिती पुस्तिकेस शुभेच्छा संदेश दिला व देणगी देऊन आशीर्वादही दिला होता.तसेच सदर उपक्रमास त्या वेळी माननीय शरद पवार, साधनाताई आमटे, डॅा.शशीकला जोशी,'सर्च'चे डॉ.राणी व डॉ.अभय बंग, कवयित्री सुनेत्रा ओक, पुणे विदयार्थी गृहाचे रामचंद्र शेटे यांनीही शुभेच्छा पाठवल्या तर अनेक जणांनी  सक्रिय सहभाग नोंदवत आम्हाला बळ दिले.

     'श्यामची आई-माझ्या घरी' या उपक्रमाच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन तत्कालीन जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलवार,जेष्ठ पत्रकार व संपादक सुधाकरराव डोईफोडे यांच्या हस्ते दि.२७ एप्रील २००७ रोजी करण्यांत आले.दोघांनीही 'श्यामची आई' पुस्तकातील संस्कारमूल्यांच्या प्रसाराचे मह-त्व विषद केले आणि उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

      या दरम्यान साने गुरुजींच्या विचारांनी व सहवासाने प्रभावित झालेले पुणे शहरात सतत १३ वर्षे पायी घरोघरी जाऊन सुमारे १५ हजार 'श्यामची आई' पुस्तकांची विकणारे दत्ता पुराणिक बाबा (ते पुण्यात 'बाबा पुराणिक' म्हणून ओळखले जात) यांची भेट झाली.त्यांनी हे व्रत शेवटच्या श्वासापर्यंत पाळणार असल्याचे आर्वजून सांगितले होते. पुराणिक बाबांनी ज्या दिवशी पुस्तक विकले जाणार नाही त्या दिवशी जेवण करावयाचे नाही अशी शपथ घेतली होती. त्यांची ही कृती आम्हाला प्रेरणा देऊन गेली. हरवत चाललेली निष्ठा आम्हाला पुराणिक बाबांच्या रुपानं समोर दिसल्याने आम्ही नतमस्तक झालो. उल्लेखनीय गोष्ट अशी की, पुराणिक बाबांची ही तळमळ, सेवाभाव लक्षात येऊन पुणे मनापाच्या परिवहनसेवेने त्यांना पुणे शहरात फिरण्यासाठी मोफत पास दिला होता.काही वर्षांपूर्वी पुराणिक बाबांचे निधन झाले. नांदेड येथे दत्ता पुराणिक बाबा यांचा राहून गेलेला सत्कार ही आमची खंत!

      संस्कार माऊली 'साने गुरुजी' यांच्या शब्दांनी मराठी मनाचे भरण-पोषण मोठया आत्मीयतेने केले आहे.मुलांना घडवण्यांत हया शब्दांचा जितका महिमा तितकाच प्रौढांनाही अंर्तमुख करणारा आहे.

      'श्यामची आई' हा साने गुरुजींच्या वात्सल्यप्रतिभेचा नितांत निर्मळ व सुंदर आविष्कार असून आईच्या प्रेममय शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र आहे.

      आचार्य अत्रे पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात: 'मानवी जीवनातल्या सर्व सदगुणांची,सौंदर्याची अन् मांगल्याची जणू काही धारच काढून ती हया चांदीच्या कासंडीत भरुन गुरुजींनी तरुण पिढीच्या हातांत दिलेली आहे. हया दृष्टीने 'श्यामची आई' ही भारताच्या मुलाबाळांची आणि तरुणांची, 'अमर गीताई'च आहे असे म्हटले पाहिजे.

      थोडक्यात भारतीय संस्कृतीचे उदात्त चित्रण आणि नैतिक मूल्यांचे मार्गदर्शन करणारी एक मार्गदर्शिका म्हणून 'श्यामची आई' हया कादंबरीचा उल्लेख गौरवाने केला जातो. सुमारे सत्तर वर्षा पूर्वी प्रसिध्द झालेल्या 'श्यामची आई' कादंबरीत त्यावेळी असणारी व आजची सामाजिक परिस्थिती बदलली असली तरी संस्कारांचे मह-त्व तितकेच आहे.

      शालेय अभ्यासक्रमात नैतिक मूल्यांची ओळख करुन देणा-या काही तासिकांचा समावेश करण्यांत आला आहे.ही बाब स्वागतार्ह आहे; परंतु अभ्यासक्रमाच्या आकृतीबंधापीलकडे जाऊन सर्व स्तरावर प्रयत्न करण्याची वेळ गरज आहे.

      एकविसाव्या शतकात स्पर्धेच्या मागे धावता धावता माणूसपण विसरुन नैतिक मूल्ये हरवत चालली आहेत. भारतीय संस्कृतीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने 'श्यामची आई' या कादंबरीतील श्यामच्या घरातील साध्या-सरळ संस्कृतीची ओळख नव्याने करुन देण्याची निकड आता भासत आहे.

      जेव्हा 'श्यामची आई' हे पुस्तक घरोघरी जाईल, मुलांची मने बनवू पाहणा-या शाळांतून जाईल, तेव्हा ते मांगल्याचा झरा मनामनात पाझरवेल असा विश्वास साने गुरुजींना होता.

      गुरुजींच्या या स्वप्नपूर्तीच्या दिशेने 'अभंग पुस्तकालय' आपल्या वाचन संस्कृती संवर्धनाच्या उपक्रमात एक नवे पाऊल टाकले. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वता:पासून करावी, या वचनानुसार 'श्यामची आई-माझ्या घरी' हा अभिनव उपक्रम २००७ या वर्षी आम्ही राबविला. सदर पुस्तकाच्या सुमारे ५००० हजार प्रतींची विक्री झाली, पण सांगण्यास आनंद वाटतो की यातील अनेक पुस्तकांच्या प्रती भेटी दाखल दिल्या गेल्या.

       हा प्रवास आनंददायक, प्रेरक आणि आश्वासक होता. संस्कृती संवर्धनाच्या या उपक्रमात नांदेड परिसरातील शाळा, सार्वजनिक ग्रंथालये, महिला मंडळे, सार्वजनिक संस्था, विद्यार्थी, सुजाण पालक यांनी सहभाग घेतला. वाढदिवस, हळदीकुंकु, बक्षीस समारंभ सारख्या कार्यक्रमांत 'श्यामची आई' पुस्तकाचे वाटप झाले.

      यापुढेही आम्हाला अभंग पुस्तकालयाच्या माध्यमांतून 'श्यामची आई',व साने गुरुजींच्या इतर साहित्याचा प्रसारासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावयाचे आहे  तसेच साने गुरुजी कथामाला या उपक्रमात सक्रिय सहभागी व्हायचे आहे.

        

                        

आदरणीय ग.प्र.प्रधान मास्तर यांची ग्रेट भेट 



माहिती पुस्तिका

आदरणीय दत्ता पुराणिक यांची भेट

 नीमा कुलकर्णीमाे.नं- ९९२३५९२२४७



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा प्रवास सुंदर आहे….

हा प्रवास सुंदर आहे….

हा प्रवास सुंदर आहे……