हा प्रवास सुंदर आहे….

 

साने गुरुजीं च्या 'श्यामची आई' पुस्तकातील नैतिकमूल्ये    आज एकविसाव्या शतकात दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक

११ जून साने गुरुजींचा स्मृती दिवस! त्यांच्या स्मृतीस अभिवादन.  साने गुरुजींनी आपले सर्व लेखनसमाजोध्दारार्थ लिहिले.त्यांच्या मनात राजकीय,सामाजिक व शैक्षणिक विषयाच्या अनुषंगाने जे जे विचारांचे,भावनांचे कल्लोळ उठले ते ते सर्व लेखणीच्या व्दारे प्रकट केले.या विपूल साहित्य् सागरातील तेजस्वी रत्नं म्हणजे 'श्यामची आई' हे पुस्तक



मला आठवतं मी सहावीत असतांना 'श्यामची आई' हे साने गुरुजींचे पुस्तक वाचले होते. आचार्य अत्रे यांनी म्हटल्या प्रमाणे हे 'मातृप्रेमाचे स्त्रोत्र' वाचुन त्या क्षणी भारावल्यासारखे झाले होते.या पुस्तकातील गोष्टी मनांत कुठेतरी रुजल्या आणि साने गुरुजी हळवा कोपरा!

कालांतराने आमचा मुलगा आदित्य् याला गोष्टी वाचून दाखवतांना 'श्यामची आई' हे साने गुरुजींचे पुस्तक मला परत भेटले.पण या वेळी या पुस्तकाचे नवीन पैलू जाणवले.  हे पुस्तक म्हणजे भारतीय संस्कृतीचे उदात्त् चित्रण आणि नैतिक मूल्यांचे मार्गदर्शन करणारी मार्गदर्शीका वाटली.माझ्याबाबतीत 'भारावलेपण ते जाणतेपण' असा माझा प्रवास झाला.साने गुरुजींसाठी त्यांची आई गुरु आणि कल्पतरु होती.श्यामची आई माझी फिलोसॉफर आणि गाईड बनली.



'श्यामची आई' पुस्तकातील स्वातंत्रपूर्व काळतील सामाजिेक परिस्थिती आणि आजची एकविसाव्या शतकातील परिस्थिती यांत खूप बदल झाला आहे. स्वातंत्र मिळाले,देशाची प्रगती झाली,जातीव्यवस्थेची बंधनं शिथील झाली,शिक्षणचा प्रसार झाला,नवीन तंत्रज्ञान विकसित झाले,नवीन पिढीसोबत जुनी पिढीही संगणक साक्षर झाली. पण संस्कारांचे महत्व तितकेच आहे.सुमारे १०० वर्षापूर्वी सांगितलेली ही संस्कारमूल्ये आज २१ व्या शतकात तितकीच कालातीत, आहेत.पुस्तकात  काळाच्या किती पुढचे विचार आहेत.पुस्तक निघूनही आता ८८ वर्षे झालीत.आजूनही या पुस्तकाच्या आवृत्या निघतच आहेत. 'श्यामची आई' पुस्तकातील एकेक शब्द स्फूर्तीमय व मनाला उभारी देवून जातो.

आज शालेय अभ्यासक्रमांत नैतिकमूल्यांची ओळख करुन देणा-या काही तासिकांचा समावेश करण्यांत आला आहे.अभ्यासक्रमानुसार खास पुस्तकं तयार करण्यांत आली आहेत. अनेक लेखक व प्रकाशकांनी या विषयाच्या अनुषंगाने पुस्तकांची निर्मिती केली आहे,ती दर्जेदारही आहेत.पण जवळपास ती सारी मूल्ये आपल्याला 'श्यामची आई' या साने गुरुजींच्या पुस्तकात भेटतात.

श्यामच्या आईत असे काय होते,कि तिचे मह-त्व् आजही वाटावे? तुमच्या आमच्या घरात वावरणा-या आजी-आई,काकू-मावशी सारखीच ती होती.चारचौघींसारखी असणा-या या बाईचे सामान्य् असणंच तिचं असामान्यत्व  होतं. पुरुषप्रधान संस्कृती मुळे घरात असणारे दुय्य्म स्थान,पराकोटीचे दारिद्रय असूनही तिला स्वाभिमानाने जगण्याचं भान होतं.अडाणी अशिक्षित असूनही तिला शिक्षणाचे महत्व होतं.मुलांनी शिक्षणा सोबत शारिरीक,मानसिक,सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावरही सक्षम असावं तिला वाटत होतं.आपल्या मुलांची पुढील शिक्षणाची सोय गावात होणार नाही हे लक्षात आल्यावर ती श्यामला व त्याच्या मोठया भावाला  तालुक्याला मग जिल्हयाच्या ठिकाणी शिक्षणा साठी पाठवते.आईनं लहानपणापासून देशभक्तीची भावना श्याम व त्याच्या भावंडात निर्माण केली. यामुळे ती मला डोळस वाटते.

पुस्तकातील काही निवडक प्रसंग काळाच्या कसोटीत आजही खरे आहेत.

* दक्षिणेचा प्रसंग

पुर्वीच्या काळी जेवायच्या ठिकाणी दक्षिणा मिळत असे.घरात गरीबी असल्याने श्यामला त्या पैशाचे महत्व वाटतं,तो ती घरी आणून आईच्या हातात देतो.परंतू मिळलेली दक्षिणा ती घरगडयाला देऊन टाकते.,आपण गरीब असलो तरी कुणापुढे हात पसरायचे नाहीत. फुकटचे बिना कष्टाचे पैसे घेणे हे पाप आहे,गरिबीतही तिला असलेले मूल्यसंस्काराचे भान महत्वाचे आहे. स्वाभीमानाने जगणं ती शिकवते,मिंधेपणा मरणासमान असतो असे सांगून देण्याचे महत्व पटवून देते.'माणसाने गरीब असले तरी मनाने श्रीमंत असावे' असे ती श्यामला सांगते.

आज सर्व क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार हे बिना कष्टाचे पैसे मिळवण्याचा मार्ग झाला

आहे.

* प्रार्थना कशी असावी - श्यामच्या घरातील वातावरण धार्मिक असल्याने तो भक्तीत रमत असे.मित्रांना जमवून भजन,कथाकिर्तन करीत असे हे करतांना रिकामे डब्बे वाजवत मुलांचा भजनाचा कार्यक्रम चाले,मुलं सारा परिसर दणाणून सोडत.देवळांत चाललेल्या पुराणास त्यामुळे अडथळा येऊ लागला.शेवटी तक्रार आई पर्यंत गेली.आईनं समजावलं 'श्याम ज्या पुजेमुळे इतरानां उगीच्या उगीच त्रास होतो,ती कसली रे पुजा?आपली प्रार्थना दुस-या कोणच्या प्रार्थनेच्या आड येवू नये. देव भावाचा भुकेला असतो'. प्रार्थनेची किती सहज सोपे व्याख्या!

आज प्रार्थनास्थळ,मंदिरा वरील भोंग्यांचे राजकारण् ,गडबड गोंगाट करणा-या धार्मिक,राजकीय मिरवणूका,सण-समारंभ,उत्सव पाहिले की, 'श्यामची आई' आठवते.आणि आठवते तिचं कालातीत तत्वज्ञान.

* श्याम मुक्या कळया तोडतो -आपल्यालाच फुलं मिळावीत या हव्यासातून एक दिवस श्याम आजूबाजूच्या सर्व झाडाची फुलं,कळया ओरबाडून आणतो. तेव्हा आई "श्याम मुक्या कळया तोडू नकोस त्यांना फुलण्याची संधी दे,त्यांना झाडावरच नीट फुलू दे,नाही तर ती कोमेजून जातात." असे पर्यावरणाचे महत्व् सहज सोप्या भाषेत सांगते.निसर्ग आणि माणसाचे हळुवार नात्याची नवी ओळख श्यामला करुन देते.

आज शाळा महाविद्यालयात पर्यावरण हा विषय अनिवार्य आहे,विद्यार्थ्यानां एक प्रकल्प् ही करावा लागतो. मंत्रीमंडळात खास पर्यावरण खातंही निर्माण करण्यांत आलं आहे.पर्यावरणा बाबत जनजागृती करण्यासाठी विविध सामाजिक संघटनाही कार्यरत आहेत.

* ओले पाय- अंघोळ करुन आल्यावर पायांना घाण लागू नये म्हणून श्याम आईला पाय ठेवायला पदर पसरायला सांगतो. 'श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप'. असे या प्रसंगात श्यामची आई त्याला सांगते.कधी ती रागाने तर कधी प्रेमाने श्यामच्या मनाला आकार देत होती.थंडी आणि उब दोन्हींमुळे विकास होतो,वाढ होते.लहान मुलांमधील मुर्तीला आकार देण्याची ही पध्दत किती लोभस आहे!.

आज कॉपीसमस्या,बालगुन्हेगारी,व्यसनाधिनता,पालक-शिक्षकांशी गैरवर्तन ही मनाला घाण लागण्याचीच लक्षणं आहेत ना!

* रामरक्षा पठनाचा प्रसंग - श्यामच्या घरी रामरक्षेचे पुस्तक नसल्याने त्याला रामरक्षा पाठ झालेली नसते.श्यामच्या मित्राकडे पुस्तक असल्याने ती पाठ करुन तो श्यामला चिडवत असतो.रडणा-या श्यामला आई समजावते,'मित्राकडून पुस्तक मागून आण व रामरक्षा लिहून काढ व पाठ कर,लिहून पाठ केलेले स्मरणात पक्के राहते'.अशा प्रकारे श्यामला रामरक्षा पाठ झाल्यानंतरचा श्यामच्या आईचा आनंद अर्वणनीय होता.

आपल्या हस्ताक्षरात नोटस काढून अभ्यास किंवा पाठांतर करण्याची किती चांगली पध्दत आहे ही! या क्रियेचा दुहेरी फायदा होत असे एक हस्ताक्षर सुधारायचे व लिहितांना वाचले गेल्याने ते लक्षात रहायचे.

आज शाळेत,कोचिंग क्लासमधे शिक्षक आणि घरी पालक प्रत्यक्ष नोटस काढण्या पेक्षा त्या झेरॉक्स् करण्यावरच भर देतात.किंवा इंटरनेट वरुन प्रिंटआऊट काढतात.विद्यार्थी मुळ पुस्तक वाचण्या ऐवजी गुगल ला विचारुन गृहपाठ करतात असेही चित्र बघायला मिळते.पालकांना यात गैर वाटत नाही याचं वाईट वाटतं.

* गरिबांविषयी कणव - एक म्हातारी मोळीवाली बाई सायंकाळी श्यामच्या घरासमोर येते.तिची आवस्था बघून श्यामची आई गरज नसतांनाही तिच्याकडून मोळी विकत घेते.या साध्या प्रसंगात आई 'जमेल तशी गरीबांची मदत करीत जावी' असे श्यामला सांगते. गरीब-श्रीमंत भेद असे काही नियम नसतात.सर्व लोक सारखेच असतात असेही समजावून सांगते.त्या काळी जातीयतेची बंध्रने कडक होती तरी आपल्या समजुती नुसार ती त्यातून मार्ग काढते.

आज एकविसाव्या शतकात कायद्यानं जातीव्यवस्था बाद झाली असली तरी ती  दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे.तसेच गरीब श्रीमंत ही दरी वाढतच चालली आहे.

* स्त्री पुरुष समानता - श्याम आईला प्रत्येक कामांत मदत करीत असतो,शेजारणी त्याला हसतात.नाराज झालेल्या श्यामला समजवतांना आई कुठलेही काम लहान मोठे नसते असे सांगते.तसेच स्वत: पुरुषप्रधान संस्कृतीत राहत असूनही श्यामची आई श्यामला स्त्री पुरुष समानतेचे महत्व् पटवून देते."बायकांनां पुरुषांची कामे आली पाहिजेत आणि पुरुषांना बायकांची कामे आली पाहिजेत.हयाचेच नाव लग्न.पुरुषांच्या -हदयात स्त्रीगुण येणे व स्त्रीजवळ पुरुषगुण येणे म्हणजे विवाह." विवाहाची किती सुंदर व्याख्या!

* पोहण्याचा प्रसंग -   आपला मुलगा भित्रा बनू नये म्हणून ती कठोरपणे पोहायला शिकवते. मुलांनी शारिरीक व मानसिक रित्या सक्षम असले पाहिजे,तसेच कुठल्याही कठीण प्रसंगाला न घाबरता खंबीर असायला हवे ही त्यामागची भावना होती.हा विचार काळाच्या कितीतरी पुढचा आहे.

आज मुलांना अती लाडानं अथवा काळजीपोटी वागवलं जात असल्यानं मुलांमधील आत्माविश्वास कमी होऊन ती भित्री व गोंधळलेली बनत आहेत.

* डोक्यावरचे केस

श्याम एकदा मित्रांच्या नादानं केस वाढवतो.केस कापण्याचा आग्रह करणा-या आईला श्याम म्हणतो 'आई केसात कसला आला धर्म'?

आई श्यामला समजावते 'तुला केस राखायचा मोह झाला ना तो चुक आहे,मोह टाळणे म्हणजे धर्म'! धर्माची इतकी सोपी व्याख्या मी तर या पुस्तकातच वाचली.

आज पाहिलं तर धर्माचा आपापल्या स्वार्थासाठी अर्थ काढून राजकारण करण्यांत येत आहे.

* बंधुप्रेम  - थकून आलेल्या मोठया भावाचे पाय दाबण्यास श्याम नकार देतो, आई त्याच्यावर न रागवता कृष्ण्-द्रौपदीच्या गोष्टीतून बंधुप्रेमाचे महत्व् पटवून देते.

आज आपल्या सभोवार पाहिले तर भाऊ- भाऊ,बहिण-भाऊ यांची बिघडलेली नातीच दिसतात.अहंकार आणि स्वार्थापोटी एकमेकांना आयुष्यातून उठवल्याच्या घटना बघायला मिळतात. स्वार्थीपणा वाढल्याने कुटुंब-समाजापासून मुलं तुटली जात आहेत.

* समर्पण- पती पत्नीच्या नात्यांतील समर्पचे महत्व सांगणरा एक प्रसंग - श्यामची आई भावाने पाठवलेल्या ओवाळीणचे पैसे पतीच्या धोतर जोडीवर खर्च करते,आपली स्वत: ची साडी फाटलेली असतांनाची तीची ही कृती पती पत्नीच्या नात्यांतील हळूवार नातं दर्शवणारी आहे.त्यांचे एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणं,आपापसातील आदर,शब्दातीत प्रेम त्यांचे जीवन समृध्द करुन जाते.

आज साध्या साध्या कारणांवरुन घटस्फोटाचे प्रमाण वाढलं आहे.

अशा छोटया छोटया प्रसंगातून श्यामच्या जाणीवा विकसित होतात.केवळ उपदेश न करता आई सतत मुलांशी संवादी राहते.श्याम सतत चुकतो पण आई त्याच्या चुका त्याला त्याच्या पातळीवर जावून समजावून सांगते. त्याच्याशी संवाद साधते आज पालकांच्या संवादाअभावी व चुकीच्या अवाजवी अपेक्षांच्या ओझ्यांमुळे लहान मुलंही आत्महात्या करीत आहेत.

आज एकविसाव्या शतकात श्यामच्या आईची गरज

आज पूर्वीचा काळ बदलला विद्यार्थी भोळी भाबडी न राहता हुशार झाली आहेत. शिक्षणचा प्रसार झाला,ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या.विज्ञान, तंत्रज्ञान विकसित झाले.नवी पिढी संगणक साक्षर होऊन  प्रगतीपथावर गेली. वडिलांसोबत आईही अर्थाजना साठी बाहेर पडली.मुलांसाठी दोघे पण हवा तसा वेळ देवू शकत नाही.मुलं जास्तीत जास्त वेळ टीव्ही,इंटरनेट च्या आहारी गेली आहेत.त्यात मोबाईलच्या प्रसारामुळे लहान-मोठयांच्या हातात मोबाईल आला.प्रत्येकाच्या जीवनाचा मोबाईल हा अपरिहार्य भाग बनला. मोबाईल च्या अती वापरामुळे सर्व वाचना पासून दूरावले,वाचना अभावी जाणीवाप्रगल्भ होत नाहीत

  नाहीत.पर्यायाने आत्मकेंद्रीतपणा वाढीस लागतो. जीवघेण्या स्पर्धेच्या मागे धावता धावता मुलं संवेदनाहीन बनत चालली आहेत.'मुलांचे उध्वस्त भावविश्व' ही एक चिंतेची बाब बनली आहे.(आत्महात्या,गुन्हेगारी,मानसिक आजार,व्यसनाधिनता इ.)

सुखवस्तु  मर्यादीत कुटुंब असल्याने सुखसुविधांचा मारा केला जातो.मुलांना एखाद्या गोष्टीची कमतरता व सोयीसुविधांचा कमीपणा माहित नसल्याने वाटून घेण्याची सवयच राहिली नाही.पर्यायाने अहंकार चुकीच्या पध्दतीने विकसित होतो आहे.

सुमारे १०० वर्षांपूर्वी श्यामच्या आईनी सांगितलेली संस्कारमूल्ये पुन्हा नव्याने नवीन पिढीला शिकवण्याची वेळ आली आहे असे प्रामाणिक पणेवाटते.देशप्रेम,धैर्य,मानवता,बंधुता,संवेदनशिलता,भावना,आपुलकी आणि आत्मविश्वास त्यांच्यात रुजवावा लागणार आहे.

आज २१ व्या शतकातील नवी पिढी सुस्कंकारित करण्याची जबाबदारी  समाजातील प्रत्येक घटकाने घेण्याची गरज आहे.त्यासाठी आकृतीबंधाच्या पलीकडे जाऊन प्रयत्न् करावे लागणार आहेत.या कामी 'श्यामची आई' या पुस्तकातील संस्कारमूल्येच पथदर्शक ठरणार आहेत.

मुलांना संवेदनशील,संस्कारी आणि सामाजिक बनवायला श्यामच्या आईची पध्दत वापरावी लागेल.मुलांशी श्यामच्या आईसारखा संवाद साधला पाहिजे.तिच्या स्वच्छ निर्मळ संस्कारांची गरज आहे.काळ बदलला असला तरी हे संस्कार भावी पिढीला दीपस्तंभाप्रमाणे आहेत.

श्याम कसा घडला यासाठी विद्यार्थ्यांनी व मुलांशी बोलावं कसं एवढे शिकविण्यासाठी तरी 'श्यामची आई' प्रत्येक शिक्षकांनी व पालकांनी वाचायला पाहिजे असे माझे प्रांजळ मत आहे

संदर्भ :-  श्यामची आई- साने गुरुजी

        पुणे विद्यार्थी गृह  प्रकाशन,पुणे.

-  नीमा कुळकर्णी  (मो.नं :- ९९२३५९२२४७)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा प्रवास सुंदर आहे….

हा प्रवास सुंदर आहे……